माझे वडील कै. श्री रघुवीर सामंत हे जुन्या पिढीतील एक प्रसिद्ध प्रयोगशील मराठी लेखक होते. माझी आई स्नेहल सामंत (पूर्वाश्रमीची वेणू गव्हाणकर) हि हिंदुस्थानी संगीतातील भारतातील प्रथम द्विपदवीधर (१९३८) होती. तिच्या संगीताचा आणि सुरेल स्वराचा वारसा मला लाभलेला आहे.
साधारण १९७९-८० पासून आजतागायत सुगम संगीत क्षेत्रात गायिका म्हणून मी कार्यरत आहे. विशिष्ठ संकल्पनांवर आधारित अशा अनेक हिंदी-मराठी कार्यक्रमात प्रमुख गायिका म्हणून मी सादरीकरण केले आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवर असंख्य कार्यक्रम सादर करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
१९४०, ५०, ६० च्या दशकातील हिंदी व मराठी गाणी माझ्या मनाला नेहमी भुरळ घालतात. त्या गाण्यांचा आनंद मी नेहमीच घेत असते. मी गायलेल्या याच गाण्यांचा एक संग्रह असावा याच एका उद्देशाने हा चॅनेल मी निर्माण करत आहे.
ही सर्वच गाणी त्या त्या मूळ गायिकांनी आपापल्या उत्तम सादरीकरणाने अविस्मरणीय व अजरामर करून ठेवली आहेत. तीच गाणी एका वेगळ्या स्वरात, वेगळ्या शैलीत गायलेली ऐकणे रसिकांना नक्कीच आवडेल असे मला वाटते.
सीमा चंद्रगुप्त २-४-२०२२ गुढीपाडवा